YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 5

5
तळ्याजवळ बरे करणे
1काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले. 2आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरेमिक भाषेत बेथसैदा#5:2 काही मूळप्रतींमध्ये बेथशाथा काही प्रतींमध्ये बेथसैदा. म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या. 3येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत.#5:3 काही मूळप्रतींमध्ये पूर्ण किंवा अर्धवट. 4कारण प्रभुचा दूत वेळोवेळी येऊन, ते पाणी हालवीत असे आणि पाणी हालविताच तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे.#5:4 काही मूळप्रतींमध्ये पूर्ण किंवा काही भाग समावून घेतला आहे, पाणी हलविले जावे म्हणून अपंग वाट पाहत होते आणि पाणी हालविल्यानंतर त्या तळ्यात प्रथम उतरणारी व कोणत्याही रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती बरी होत असे 5तेथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक माणूस होता. 6येशूंनी त्याला तेथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून, त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
7“महाराज,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.”
8तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरुण उचलून चालू लाग.” 9त्याचक्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरुण उचलून चालत गेला.
ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ#5:9 शब्बाथ हा दिवस पवित्र पाळला जात असे, त्या दिवशी काम करीत नसत, तो विश्रांतीचा दिवस म्हणून पाळला जात असे. दिवस होता. 10आणि यहूदी पुढारी त्या बर्‍या झालेल्या मनुष्याला म्हणाले, “शब्बाथ दिवशी अंथरुण उचलणे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
11परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, तो म्हणाला, ‘तुझे अंथरुण उचलून चालू लाग.’ ”
12त्यांनी त्याला विचारले, “तुझे अंथरुण उचलून चालू लाग, असे सांगणारा व्यक्ती कोण आहे?”
13जो मनुष्य बरा झाला होता त्याला आपल्याला कोणी बरे केले, याची कल्पना नव्हती, कारण येशू गर्दीत दिसेनासे झाले होते.
14नंतर येशूंना तो माणूस मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” 15मग त्या मनुष्याने यहूदी पुढार्‍यांकडे जाऊन ज्याने मला बरे केले तो येशू आहे असे सांगितले.
पुत्राचा अधिकार
16येशू शब्बाथ दिवशी अशा गोष्टी करीत असल्यामुळे यहूदी पुढार्‍यांनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. 17येशूंनी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले व म्हणाले, “माझा पिता या दिवसापर्यंत सतत कार्य करीत आहे आणि मी देखील कार्य करीत आहे.” 18या कारणासाठी तर यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यास अधिकच आतुर झाले; कारण त्यांनी शब्बाथ मोडला होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वतःला परमेश्वरासमान केले होते.
19येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो. 20पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो जे करतो ते सर्व पुत्राला विदित करतो. होय आणि तो याहूनही मोठी कृत्ये त्याला दाखवील व त्यामुळे तुम्ही चकित व्हाल. 21कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो. 22याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे, 23यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले, त्या पित्याचाही सन्मान करीत नाही.
24“मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे. 25मी निश्चित सांगतो, अशी वेळ येत आहे आणि आलेलीच आहे की त्यावेळी मेलेले लोक परमेश्वराच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील, ते जिवंत राहतील. 26कारण ज्याप्रमाणे पित्यामध्ये जीवन आहे, त्याचप्रमाणे पुत्रामध्येही जीवन असावे अशी त्यांनी योजना केली आहे. 27आणि तो मानवपुत्र आहे म्हणून न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यांना दिला आहे.
28“याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे हे की, जे सर्व कबरेमध्ये आहेत ते त्यांची वाणी ऐकतील, 29आणि बाहेर येतील. ज्यांनी चांगली कर्मे केली आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी उठतील, व ज्यांनी दुष्कर्मे केली आहेत ते दंड भोगण्यासाठी उठतील. 30मी स्वतःहून काही करू शकत नाही; मी ऐकतो त्याप्रमाणे न्याय करतो आणि माझा निर्णय योग्य आहे, कारण मी स्वतःस खुश करू इच्छित नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांना खुश करू पाहतो.
येशूंविषयी साक्ष
31“जर मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी ठरणार नाही. 32परंतु दुसरा एक आहे जो माझ्या बाजूने साक्ष देतो आणि त्याने जी साक्ष माझ्याबद्दल दिली, ती खरी आहे.
33“तुम्ही लोकांना योहानाकडे पाठविले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली 34मी मनुष्याची साक्ष स्वीकारतो असे नाही; मी हे यासाठी सांगत आहे की त्याद्वारे तुमचे तारण व्हावे. 35योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले.
36“माझी जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा वजनदार आहे. कारण जी कामे पूर्ण करण्याचे मला पित्याने सोपविले आहे, तीच कार्ये मी करीत आहे व ती साक्ष देतात की, पित्यांनीच मला पाठविले आहे. 37ज्या पित्याने मला पाठविले त्यांनी स्वतःच माझ्याबद्दल साक्ष दिली आहे. तुम्ही त्यांची वाणी कधीही ऐकली नाही आणि त्यांची आकृती पाहिली नाही, 38त्यांचे वचन तुम्हामध्ये राहत नाही, कारण ज्याला त्यांनी पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. 39तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात; 40तरी जीवनप्राप्ती साठी तुम्ही माझ्याकडे येत नाही.
41“मी मनुष्याचे गौरव स्वीकारीत नाही, 42परंतु मी तुम्हाला ओळखतो व मला चांगले माहीत आहे की तुमच्या हृदयात परमेश्वराची प्रीती नाही. 43कारण मी पित्याच्या नावाने आलो, पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही; परंतु जर स्वतःच्याच नावाने दुसरा कोणी आला, तर तुम्ही त्याला स्वीकाराल. 44जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?
45“परंतु मी पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवेन असा विचार करू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशेच तुम्हाला दोषी ठरवेल. 46तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला, तर माझ्यावरही ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. 47परंतु ज्याअर्थी तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवीत नाही, त्याअर्थी मी जे सांगतो त्यावर विश्वास कसा ठेवाल?”

सध्या निवडलेले:

योहान 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

योहान 5 साठी चलचित्र