YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सफन्याह 2

2
राष्ट्रांबरोबर यहूदीया आणि यरुशलेमचा न्याय
यहूदीयास पश्चात्तापासाठी आव्हान
1हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये,
स्वतःला एकवटून घे,
2फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी
आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी,
याहवेहचा भयंकर संताप
तुझ्यावर कोसळण्यापूर्वी,
याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस,
तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.
3या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा,
तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता.
धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा;
याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी
कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.
फिलिस्तिया
4गाझाचा त्याग करण्यात येईल
आणि अष्कलोन ओसाड पडेल.
भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल
आणि एक्रोन समूळ उपटले जाईल.
5हे करेथीयाच्या लोकांनो,
समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो;
कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो,
याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे.
ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन,
की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”
6समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल
मेंढपाळांसाठी विहिरी असलेले स्थान
व मेंढरांसाठी मेंढवाड्याचे ठिकाण होईल.
7ती भूमी यहूदीयाच्या वंशातील
अवशेषाचे वतन होईल;
तिथे त्यांची कुरणे असतील.
संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात
विश्रांती घेतील.
याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील;
त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.#2:7 किंवा त्यांचे बंदिवान मी परत आणेन
मोआबी आणि अम्मोनी
8“मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी
आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत,
जे माझ्या लोकांचा उपहास करतात
आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.
9म्हणून माझ्या जिवाची शपथ,”
इस्राएलचे परमेश्वर,
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
“निश्चितच मोआब हा सदोमासारखा,
अम्मोनी गमोरासारखा होईल
तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे
कायमची ओसाड ठिकाणे होतील.
माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील;
माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”
10त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे
हे प्रतिफळ मिळेल.
कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.
11जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील,
तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील.
दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर
त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.
कूश#2:12 कूश अर्थात् इथिओपिया
12“अहो कूशी#2:12 नाईल नदीच्या वरच्या भागातील भूमी लोकांनो,
तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”
अश्शूर
13ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील
आणि अश्शूरचा नाश करतील,
निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड
आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.
14कळप व मेंढरे
सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील.
तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे
तिच्या स्तंभावर निवारा घेतील.
घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल,
तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील,
देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.
15ही नगरी चैनबाजी करणारी,
सुरक्षितेत वसणारी होती.
ती स्वतःशी म्हणत असे,
“मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.”
पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे,
जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण!
तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून
त्यांचे डोके हलवितात.

सध्या निवडलेले:

सफन्याह 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन