जखर्याह 7
7
न्याय आणि कृपा, उपवास नको
1दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्याहला याहवेहकडून संदेश मिळाला. 2बेथेल शहरात राहणार्या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी, 3सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना विचारून, “मी इतकी वर्षे करत आलो त्याप्रमाणे मी पाचव्या महिन्यात शोक व उपवास करावा काय?”
4मग सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला आले: 5“तुमच्या देशातील सर्व लोकांना आणि याजकांना हा प्रश्न विचार, ‘गेली सत्तर वर्षे तुम्ही पाचव्या आणि सातव्या महिन्यात जे उपवास आणि शोक करीत होता, ते खरोखर माझ्यासाठी उपवास करत होते काय? 6आणि आता देखील तुम्ही मेजवान्या करता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी करीत नाही का? 7ज्यावेळी यरुशलेम आणि तिच्या सभोवतीची उपनगरात शांती व समृद्ध होती आणि नेगेव व दक्षिणेकडील तळवटीच्या प्रदेशातील लोकांचा तिथे जम बसला होता, त्यावेळीच याहवेहनी संदेष्ट्यांद्वारे लोकांना इशारा दिला नव्हता का?’ ”
8जखर्याहला याहवेहकडून पुन्हा संदेश आला: 9“सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘निष्पक्ष न्यायदान करा; एकमेकांशी करुणेने व दयेने वागा. 10विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’
11“पण त्यांनी माझ्या संदेशाकडे लक्ष देण्याचे नाकारले; त्यांनी हट्टीपणाने माझ्याकडे पाठ केली व आपल्या कानात बोटे घातली. 12त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.
13“ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 14चक्रीवादळाप्रमाणे मी त्यांची दूरदूरच्या देशांत पांगापांग केली. त्यांनी मागे सोडलेला त्यांचा देश असा ओसाड झाला, की त्यातून कोणी प्रवासदेखील करेनासे झाले. एकेकाळचा तो रमणीय देश आता त्यांनी निर्जन केला.’ ”
सध्या निवडलेले:
जखर्याह 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.