त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला. त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब या देशात गेले आणि तिथे राहिले. आता नाओमीचा पती एलीमेलेख मरण पावला आणि ती तिच्या दोन पुत्रांसह एकटी राहिली. त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर, महलोन आणि किलिओन हे दोघेही मरण पावले आणि आता नाओमी तिचे दोन पुत्र आणि तिचा पती यांच्याशिवाय राहू लागली. जेव्हा नाओमीने ऐकले की, याहवेह मोआब येथे त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली. ती ज्या ठिकाणी राहत होती ते तिने सोडले आणि तिच्या दोन सुनांना घेऊन ती त्या मार्गाने निघाली जो त्यांना परत यहूदीया देशाकडे नेत होता. नंतर नाओमी तिच्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघीही तुमच्या आईच्या घरी परत जा. जशी तुम्ही तुमच्या मृत पतींवर आणि माझ्यावर दया दाखविली तशीच याहवेह तुमच्यावर दया करो. याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांची चुंबने घेतली आणि त्या मोठ्याने रडू लागल्या आणि त्या तिला म्हणाल्या, “आम्हीही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे परत जाऊ.” परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील? माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता— तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो. तुमच्यापेक्षा मला हे फारच दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!” त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.” परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.” जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले.
रूथ 1 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रूथ 1:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ