YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 3:9-24

रोमकरांस 3:9-24 MRCV

तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे. असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.” “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.” “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात, दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात, आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.” “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.” आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल. नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते. पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे. परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.