YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 2

2
परमेश्वराचा नीतिपर न्यायनिवाडा
1जे तुम्ही दुसर्‍यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्‍यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहा, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही. 2आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. 3तू सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करतो, पण तीच कृत्ये स्वतः करतोस तर, तू परमेश्वराच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते का? 4त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?
5तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात. 6परमेश्वर “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे योग्य ते प्रतिफळ देतील.”#2:6 स्तोत्र 62:12; नीति 24:12 7जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील. 8पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील. 9वाईट करणार्‍या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयांवर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील. 10परंतु सर्व चांगले काम करणार्‍यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील. 11कारण परमेश्वर पक्षपात करीत नाही.
12नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल. 13नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल. 14निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले. 15ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवतात. 16हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील.
यहूदी आणि नियमशास्त्र
17आता, जर तुम्ही स्वतःला यहूदी समजता व नियमशास्त्रावर अवलंबून राहता आणि परमेश्वरामध्ये प्रौढी मिरवता; 18तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता; 19तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल. 20नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मुर्खांचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहो असे तुम्हाला वाटते. 21जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता? 22जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर लुटता का? 23जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता? 24मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”#2:24 यश 52:5; यहे 36:20, 22
25नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात. 26जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय? 27ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता.
28कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही. 29तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तिची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.

सध्या निवडलेले:

रोमकरांस 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन