YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 11:1-18

रोमकरांस 11:1-18 MRCV

मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे. ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली: “प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.” यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.” वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही. मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले, जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.” दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो. त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.” मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील. त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल! मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो. या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे. त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का? आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार. जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात. परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मुळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते.