स्तोत्रसंहिता 72
72
स्तोत्र 72
शलोमोनाची गीत रचना
1हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व
आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.
2तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो,
तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.
3मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो,
आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.
4तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो
आणि गरजूंच्या मुलांना वाचवो;
तो जुलमीला चिरडून टाको.
5जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील,
तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या तुमचे भय बाळगून तुमचा आदर करोत.
6कापलेल्या गवतावर पडणार्या पावसाप्रमाणे,
पृथ्वीला पाणी देणार्या सरीप्रमाणे तो होवो.
7त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो
आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.
8त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
आणि नदीपासून#72:8 अर्थात् फरात नदी किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.
9अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत
आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10तार्शीश आणि तटवर्तीय राजे
आपआपले नजराणे आणोत,
शबा व सबा यांचे सर्व राजे
आपले उपहार आणोत.
11होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत;
सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.
12ज्यांचा कोणी सहायक नाही अशा
धावा करणार्या दुःखितांना तो मुक्त करेल.
13दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो;
तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
14तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल,
कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
15तो चिरायू होवो!
त्याला शबाचे सोने मिळो;
त्याचे लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत
आणि दिवसभर त्याला आशीर्वाद देवोत.
16देशभर विपुल धान्य उगवो;
लबानोनच्या#72:16 किंवा डोंगराच्या शिखरावर ते डोलू द्या,
देशातील डोंगरही धान्याने आच्छादून जावोत;
शेतातील भरगच्च गवताप्रमाणे शहरे लोकांनी भरून गजबजून जावोत.
17त्याचे नाव सर्वकाळ राहो,
जोपर्यंत सूर्य आहे, त्याचे नाव वाढत जावो.
सर्व राष्ट्रे त्याच्याद्वारे आशीर्वादित होवोत,
आणि ते त्याला धन्य म्हणोत.
18इस्राएलाचे परमेश्वर, याहवेह धन्यवादित असोत,
केवळ तेच महान कार्य करतात.
19त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो;
सर्व पृथ्वी त्यांच्या गौरवाने भरो.
आमेन आणि आमेन.
20इशायाचा पुत्र दावीदच्या प्रार्थना समाप्त झाल्या.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 72: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.