स्तोत्रसंहिता 49
49
स्तोत्र 49
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
1अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका;
अहो सर्व जगातील,
2उच्च व नीच अशा दोघांनी,
श्रीमंत आणि गरीब लोकांनो, तुम्ही हे ऐकावे:
3माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात;
माझ्या अंतःकरणाचे मनन सुज्ञतेचे असणार.
4दृष्टांताकडे मी आपले कान लावेन;
मी वीणेच्या साथीवर कोडे स्पष्ट करेन:
5संकटकाळी मला भिण्याचे कारण काय,
जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात—
6जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात,
आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात?
7कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही;
किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही.
8कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे,
कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—
9जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे
आणि कबरेचा अनुभव त्यांना येऊ नये.
10सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते;
मूर्ख व अज्ञानी माणसेही मरण पावतात,
ते आपली संपत्ती दुसर्यांसाठी ठेवून जातात.
11त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली,
तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील;
ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील.
12परंतु लोकांची संपत्ती कितीही असली,
तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.
13ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे,
व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला
14ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात;
मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल
(प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील)
त्यांचे देह कबरेत उतरतील,
कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
15परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील
आणि माझा स्वीकार करतील. सेला
16जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात,
त्यांच्या घराचे वैभव वाढेल, तेव्हा भेदरून जाऊ नका.
17कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत;
त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही.
18जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली—
कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते—
19तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो
आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही.
20समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली,
तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 49: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.