हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या,
जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे.
मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून
त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन.
तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा,
कारण तेच मला आनंद देतात.
मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी,
परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे.
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा;
तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा,
म्हणजे तुमचे भय कायम राहील.
लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा,
कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत.
तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे!
तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन
तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;
मग मला टोचून बोलणार्यांना मी उत्तर देईन,
कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.
तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका,
कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे.
मी सदासर्वकाळ,
तुमच्या नियमांचे सतत पालन करेन.
मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो,
कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.
तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन
आणि मी लज्जित केला जाणार नाही.
तुमच्या नियमात माझा आनंद आहे,
कारण ते मला प्रिय आहेत.
मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन,
जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन.
तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा,
कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे:
तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात,
तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही.
याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो,
व त्यापासून माझे सांत्वन होते.
संताप मला व्यापून टाकतो,
कारण त्या दुष्टांनी तुमच्या आज्ञा धिक्कारल्या आहेत.
मी कुठेही राहिलो तरी,
तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत.
हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो,
जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन.
तुमच्या आज्ञांचे पालन करणे:
माझा परिपाठ झाला आहे.
याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात;
तुमचे नियम पालन करण्याचे मी वचन दिले आहे.
पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो;
आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा.
माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला,
आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.
मी त्वरा करेन,
आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.
दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही,
मी तुमचे नियम विसरणार नाही.
मी मध्यरात्रीही उठून
तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन.
माझी मैत्री त्या सर्वांशी आहे,
जे तुमचे भय धरतात व तुमचे आज्ञापालन करतात.
हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे;
तुमचे नियम मला शिकवा.