YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 12:1-14

नीतिसूत्रे 12:1-14 MRCV

जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय. नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात. दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे. नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो. दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते. दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो. स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे. नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात. जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात. दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते. दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो. ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.

नीतिसूत्रे 12 वाचा