गणना 8
8
दीपांची मांडणी
1मग याहवेह मोशेला म्हणाले, 2“अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”
3याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले. 4दीपस्तंभ अशाप्रकारे घडविला गेला होता: जसे याहवेहने मोशेला दाखविले होते त्या नमुन्याप्रमाणेच तो त्याच्या बैठकीपासून त्याच्या फुलांपर्यंत सोन्याने घडविला होता.
लेव्यांचे समर्पण
5याहवेह मोशेला म्हणाले, 6“लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर. 7त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील. 8मग त्यांनी एक गोर्हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा. 9लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे. 10लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत. 11अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”
12मग लेव्यांनी गोर्ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा. 13मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे. 14अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.
15तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे. 16इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे. 17इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे. 18आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. 19मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.
20मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले. 21लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले. 22नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले.
23याहवेह मोशेला म्हणाले, 24“लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे. 25पन्नासाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या रोजच्या सेवेतून निवृत्त व्हावे व त्यानंतर काम करू नये. 26त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.”
सध्या निवडलेले:
गणना 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.