YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20

20
खडकातून पाणी
1पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले.
2त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले. 3लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते! 4याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय? 5इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”
6मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले. 7मग याहवेह मोशेला म्हणाले, 8“आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”
9मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले. 10मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?” 11मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.
12परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”
13हे मरीबाहचे#20:13 म्हणजे कलह पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.
एदोम इस्राएलला वाट नाकारतो
14मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला:
“तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे. 15आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली, 16पण आम्ही जेव्हा याहवेहचा धावा केला, तेव्हा याहवेहने आमचे रडणे ऐकले, त्यांनी एक दूत पाठवून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.
“आता आम्ही इथे तुझ्या सीमेवरील टोकावर, कादेश नगरात आहोत. 17कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.”
18पण एदोम म्हणाला:
“तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”
19इस्राएली लोकांनी उत्तर दिले:
“आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.”
20त्यांनी पुन्हा उत्तर दिले:
“तुम्ही जाऊ शकत नाही.”
तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला. 21एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले.
अहरोनाचा मृत्यू
22संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला. 23एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले, 24“अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले. 25अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा. 26अहरोनाची वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलअज़ारला घाल, कारण तो त्याच्या लोकांशी जाऊन मिळेल; तो तिथे मरण पावेल.”
27जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले. 28मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले, 29आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला.

सध्या निवडलेले:

गणना 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन