YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 16

16
कोरह, दाथान अबीराम यांचे बंड
1लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले 2आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते. 3ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”
4जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला. 5मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील. 6तर कोरहा, तू आणि तुझ्या सर्व अनुयायांनी असे करावे: धुपाटणे घ्या 7आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”
8मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका! 9तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? 10त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता. 11तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”
12मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही! 13दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे! 14त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय#16:14 किंवा या माणसांना फसवितो? नाही, आम्ही येणार नाही!”
15मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”
16पुढे मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तुला अनुसरणाऱ्या सर्वांना घेऊन तू येथे याहवेहसमोर ये. तू आणि ते व अहरोनही त्यावेळी हजर असेल. 17प्रत्येकाने असे सर्व मिळून आपआपल्या दोनशे पन्नास धुपाटण्या धुपासह याहवेहसमक्ष घेऊन यावे. अहरोन त्याचे आणि तू तुझे धुपाटणे घेऊन हजर व्हावे.” 18याप्रमाणे प्रत्येकाने आपले धुपाटणे घेतले, त्यात जळते निखारे व धूप टाकला आणि ते मोशे आणि अहरोन यांच्याबरोबर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले. 19जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले. 20याहवेह, मोशे व अहरोन यांना म्हणाले, 21“तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.”
22पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्‍यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”
23नंतर याहवेह मोशेला म्हणाले, 24“कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूपासून सर्व समुदायाला दूर व्हावयाला सांग.”
25तेव्हा मोशे दाथान व अबीराम यांच्या तंबूकडे धावत गेला. त्याच्यामागे इस्राएली पुढारीही गेले. 26त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.” 27मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.
28त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल: 29जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही. 30परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”
31त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली 32आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले. 33ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले. 34त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले.
35नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.
36याहवेह मोशेला म्हणाले, 37“अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला अग्नीमधून सर्व धुपाटणी ओढून घेण्यास सांगावे. कारण ती पवित्र असून याहवेहला समर्पित केलेली आहेत. त्याचप्रमाणे त्याने तो जळका धूपही थोड्या अंतरावर विखरून टाकावा. 38ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून पाप केले होते, त्या लोकांच्या धुपाटण्यांतील हा धूप विखरून टाकावा. नंतर वेदीला आच्छादन म्हणून त्या धुपाटण्याचे रुंद पत्रे तयार करावेत, कारण ती धुपाटणी याहवेहपुढे वापरली असल्यामुळे पवित्र आहेत. वेदीवरील हा पत्रा इस्राएली लोकांना या प्रसंगाचे चिन्ह म्हणून राहील.”
39त्याप्रमाणे एलअज़ार याजकाने ती दोनशे पन्नास कास्याची धुपाटणी घेतली आणि ती ठोकून वेदीला आच्छादन करण्याकरिता त्यांचा पत्रा तयार केला. 40कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या.
41पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”
42लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले. 43मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले; 44आणि याहवेह मोशेला म्हणाले, 45“या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.
46नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.” 47मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले. 48मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली. 49परंतु त्याअगोदरच 14,700 लोक मरण पावले होते. आदल्याच दिवशी कोरहाबरोबर मेलेल्या लोकांव्यतिरिक्त हे आणखी लोक मरण पावले होते. 50यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती.

सध्या निवडलेले:

गणना 16: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन