YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 11

11
याहवेहपासून अग्नी
1मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला. 2जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला. 3म्हणून त्या जागेचे नाव तबेरा#11:3 अर्थात् जळणे असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.
याहवेहकडून लावे पक्षी येतात
4नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे! 5इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. 6परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”
7मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता. 8लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे. 9रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.
10प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला. 11मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे? 12मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता? 13या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’ 14मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे. 15तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”
16याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे. 17मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.
18“लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल. 19तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस, 20परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”
21पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’ 22गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”
23याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”
24मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले. 25मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.
26पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली. 27एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.”
28नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!”
29पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!” 30नंतर मोशे व इस्राएलांचे वडीलजन छावणीकडे परतले.
31मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात#11:31 अंदाजे 90 सें.मी. उंचीचा थर पसरला. 32त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर#11:32 अंदाजे 1.6 मेट्रिक टन वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले. 33परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले. 34म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा#11:34 अर्थात् लालसेच्या कबरा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले.
35किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले.

सध्या निवडलेले:

गणना 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन