YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 6

6
पुनर्बांधणीला आणखी विरोध
1सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते, 2तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात#6:2 किंवा केफिरीम भेटू या.”
पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले, 3म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?” 4त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.
5पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्रे घेऊन आला. 6त्या पत्रात असा मजकूर होता:
“देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस, 7आणि अशी घोषणा करण्यासाठी तू यरुशलेममध्ये संदेष्ट्याची नेमणूक केली आहेस की: ‘यहूदीयामध्ये आता एक राजा आहे!’ ही बातमी राजाकडे जाणार आहे; म्हणून इकडे येऊन या गोष्टी आमच्याशी बोल.”
8तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, “तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत.”
9“यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते.
पण मी प्रार्थना केली, “आता माझे बाहू बळकट करा.”
10एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.”
11पण मी म्हणालो, “माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? अथवा माझ्यासारख्याने स्वतःचा प्राण वाचविण्याकरिता मंदिरात लपून बसावे? मी मुळीच जाणार नाही!” 12नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती. 13मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांना मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते.
14हे माझ्या परमेश्वरा, तोबीयाह, सनबल्लट हे माझ्याशी कसे वागले हे विसरू नका. नोअद्याह संदेष्टी व इतर संदेष्टे ज्यांनी मला भीती घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तुम्ही विसरू नका. 15शेवटी बावन्न दिवसांच्या अवधीत, एलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी तट बांधून तयार झाला.
पूर्ण झालेल्या तटबंदीच्या बांधकामास विरोध
16आमच्या शत्रूंनी व आजूबाजूच्या देशांनी याबद्दल ऐकले, तेव्हा ते घाबरले आणि त्यांचा आत्मविश्वास ढासाळला, कारण हे कार्य आमच्या परमेश्वराच्या मदतीनेच झाले आहे, याची त्यांना जाणीव झाली.
17तसेच, या दिवसात यहूदीयातील प्रतिष्ठित लोक तोबीयाहास बरीच पत्रे पाठवू लागले व तोबीयाकडून त्यांना उत्तर मिळत गेले. 18यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता. 19याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली.

सध्या निवडलेले:

नहेम्या 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन