जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले. येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले.
येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?”
गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे; ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.”
येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.”
त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला.
“हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले.
वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून, त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु तुम्ही काही करू शकत असाल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.”
“जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”
मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”
हे पाहण्याकरिता लोक धावत तेथे येत आहेत, हे पाहून येशूंनी दुरात्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.”
हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली, व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले. परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.
नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”
त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”