YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:37-62

लूक 9:37-62 MRCV

दुसर्‍या दिवशी जेव्हा ते डोंगरावरून खाली उतरले, त्यावेळी येशूंना एक मोठा समुदाय येऊन भेटला गर्दीतील एक मनुष्य येशूंना हाक मारून म्हणाला, “गुरुजी, मी तुमच्याजवळ विनंती करतो की माझ्या एकुलत्या एका पुत्राला आपण पाहावे, एक दुरात्मा याला धरून ठेवतो आणि तो एकाएकी किंचाळू लागतो; हा आत्मा त्याला पिळून काढतो व मुलाच्या तोंडाला फेस येतो. तो त्याला फार ठेचतो, जखमा करतो व त्याचा नाश करावयास पाहतो. या दुरात्म्याला बाहेर काढावे अशी मी तुमच्या शिष्यांना विनंती केली की, परंतु ते काढू शकले नाहीत.” येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, मी किती वेळ तुमच्याबरोबर राहू व तुमचे सहन करू? मुलाला इकडे घेऊन या.” मुलगा येशूंकडे येत असताना, अशुद्ध आत्म्याने त्याला जमिनीवर आपटले व त्याला झटके आले. परंतु येशूंनी दुरात्म्याला धमकावून त्या मुलाला बरे केले व वडिलांच्या स्वाधीन केले. परमेश्वराच्या शक्तीचे हे प्रात्यक्षिक पाहून लोक आश्चर्यचकित झाले. येशू करीत असलेल्या चमत्कारांच्या गोष्टींविषयी लोक आश्चर्य व्यक्त करीत असतानाच, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.” परंतु ते काय म्हणतात हे त्यांना समजले नाही. त्याचे आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि या गोष्टींविषयी त्यास विचारण्याची त्यांना भीती वाटली. आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला. पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून, ते शिष्यांना म्हणाले, “जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो मला पाठविणार्‍याचा स्वीकार करतो. जो तुम्हामध्ये सर्वात कनिष्ठ आहे तोच थोर आहे.” योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.” येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.” येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले. मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?” परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले. नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्‍या गावाकडे निघून गेले. ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.” येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.” आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.” येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.” आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.” पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”

लूक 9 वाचा

ऐका लूक 9