एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?”
ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.”
“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.”
येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःखे सहन करावी आणि वडीलजन व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.”
नंतर ते सर्वांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, तर जेव्हा मानवपुत्र पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईन तेव्हा त्यालाही त्याची लाज वाटेल.
“मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”
या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूंनी बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली. मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्या प्रयाणासंबंधाने बोलत होते. यावेळी पेत्र आणि इतर दोन शिष्यांना अतिशय झोप आली होती, परंतु जागे झाल्यानंतर त्यांनी येशूंचे वैभव पाहिले आणि दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे असलेले पाहिले. मग मोशे व एलीयाह येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते.
पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले. मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.