YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 9

9
याजकांच्या सेवेचा प्रारंभ
1आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले. 2तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्‍हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर. 3मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत, 4आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्‍हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.”
5म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली. 6तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.”
7मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.”
8तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्‍ह्याचा वध केला. 9मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले. 10याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला. 11कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले.
12मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले. 13मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला. 14त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.
15मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.
16नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले. 17मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले.
18यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले. 19परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा 20त्या बलींच्या उरांवर ठेवली, मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला. 21मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले.
22मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.
23नंतर मोशे व अहरोन सभामंडपात गेले. ते परत बाहेर आले, तेव्हा त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला आणि याहवेहचे वैभव सर्वांना प्रकट झाले. 24याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले.

सध्या निवडलेले:

लेवीय 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन