लेवीय 4
4
पापार्पण
1याहवेह मोशेला म्हणाले: 2“इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”
3एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण#4:3 किंवा शुद्धीकरणाचे अर्पण म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्हा अर्पण करावा. 4त्याने तो गोर्हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा. 5मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून 6याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. 7नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे. 8नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, 9दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे. 10शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे. 11परंतु त्या गोर्ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी, 12त्या गोर्ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.
13जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल, 14आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा. 15तिथे इस्राएली समुदायातील पुढार्यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा. 16नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे. 17याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे. 18त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 19त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे. 20पापार्पणाच्या गोर्ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. 21नंतर तो गोर्हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे.
22जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो, 23ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे. 24त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय. 25मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे. 26शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.
27समुदायातील सामान्य मनुष्याने चुकून पाप केले व याहवेहने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे ते दोषी ठरले, 28पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी. 29त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा. 30याजकाने आपल्या बोटांनी काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 31मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
32जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी. 33होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा. 34“नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.” 35शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
सध्या निवडलेले:
लेवीय 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.