YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:27-46

लेवीय 26:27-46 MRCV

“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल, तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन. तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल. तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन. तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही. मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील. मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल. जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल. अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल. “ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील. कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही. तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील, ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील, तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन. कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला. त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे. परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ” हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.

लेवीय 26 वाचा