YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 1

1
1एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी,
आता कशी निर्जन झाली आहे!
एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती,
तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे!
एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी
आता कशी दासी झाली आहे.
2रात्रभर ती अत्यंत रडत असते;
तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत.
तिच्या सर्व प्रियकरात तिचे
सांत्वन करणारा कोणी नाही;
तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे;
ते तिचे शत्रू बनले आहेत.
3पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर
यहूदाह बंदिवासात गेली आहे.
ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते;
आता तिला कुठेही आराम मिळत नाही.
जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी
तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.
4सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत,
निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही.
तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत,
तिचे याजक कण्हत आहेत,
तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत,
आणि तिला अत्यंत पीडा होत आहे.
5तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत;
तिचे शत्रू सुखात आहेत.
याहवेहने तिला दुःख दिले आहे,
कारण तिने अनेक पापे केली आहेत.
तिचे बालक बंदिवासात गेले आहेत.
ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.
6सीयोनकन्येचे
सर्व वैभव लुप्त झाले आहे.
तिचे राजपुत्र ज्यांना चरण्याकरिता
कुरण उपलब्ध नाही अशा हरिणासारखे झाले आहेत;
सामर्थ्यहीन होऊन ते
त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांपासून त्यांनी पलायन केले आहे.
7यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये
ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते
जे तिचे गतवैभवाचे दिवस होते.
जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले,
तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते.
तिचे शत्रू तिच्याकडे बघतात,
आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.
8कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली
म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे.
तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात,
कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे;
ती कण्हते
व वळून निघून जाते.
9तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे;
तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही.
तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते;
तिचे सांत्वन करणारा कोणी नाही.
“हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा,
शत्रू विजयी झाला आहे.”
10तिच्या सर्व संपत्तीवर
तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे.
परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश
करताना तिने बघितले होते—
तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी
तुमच्या सभास्थानात प्रवेश केला.
11अन्नाचा शोध घेत असताना
तिचे लोक कण्हत आहेत;
मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत
जेणेकरून ते जिवंत राहतील.
“हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या,
मी कशी घृणास्पद झाले आहे.”
12या वाटेच्या वाटसरूंनो माझी
दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय?
मला जे दुःख देण्यात आले आहे,
त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय?
याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी
ही वेदना माझ्यावर लादली आहे.
13त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे
व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे.
त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे
व मला मागे वळविले आहे.
त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे,
मी दिवसभर मूर्छित होत आहे.
14माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत#1:14 किंवा त्याने माझ्या पापावर नजर ठेवली;
त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत.
ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत,
आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे.
मी ज्यांचा सामना करू शकत नाही,
त्यांच्या हाती मला दिले आहे.
15“माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना
प्रभूने नाकारले आहे;
माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी
प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास#1:15 किंवा समय ठरवून ठेवला आहे फर्माविले आहे.
त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी
कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.
16“याकारणास्तव मी रडत आहे
आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे.
माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही,
माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही.
माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत.
कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.”
17सीयोन हात पसरीत आहे,
पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही.
कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे
तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत;
तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम
अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.
18“याहवेह नीतिमान आहेत,
तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले.
सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या;
माझ्या वेदना पाहा.
कारण माझे तरुण व तरुणी
बंदिवासात गेले आहेत.
19“मी माझ्या मित्रगणांना बोलाविले
पण त्यांनी माझा विश्वासघात केला.
माझे याजक आणि वडीलजन
स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी
जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते
तेव्हा ते नगरात नष्ट झाले.
20“हे याहवेह, माझ्या वेदना पाहा!
माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे,
आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे.
कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते.
बाहेर तलवार मला मृत्यू आणते;
आत तर केवळ मरणच आहे.
21“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे,
पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही.
माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे
तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे;
तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो
म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.
22“त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत;
माझ्या सर्व पापांमुळे
तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला
तसाच त्यांच्याशीही करा.
माझे उसासे खूप आहेत
व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”

सध्या निवडलेले:

विलापगीत 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन