YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 18

18
उरलेल्या भूमीची विभागणी
1संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता. 2परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.
3तेव्हा यहोशुआ इस्राएली लोकांना म्हणाला, “याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेला प्रदेश ताब्यात घेण्यास तुम्ही किती वेळ वाट पाहणार आहात? 4प्रत्येक गोत्रातून तीन पुरुषांची नेमणूक करा. आपआपल्या वतनानुसार देशाचे सर्वेक्षण करावे व त्याचे वर्णन लिहावे म्हणून मी त्यांना पाठवेन. मग त्यांनी माझ्याकडे परत यावे. 5तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे. 6त्या सात प्रदेशांचे वर्णन लिहिल्यावर ते तुम्ही माझ्याकडे आणावे, मग याहवेह आपल्या परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. 7तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”
8जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.” 9तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले.
10तेव्हा शिलोह येथे याहवेहसमोर यहोशुआने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व तिथे त्याने इस्राएली लोकांच्या गोत्राच्या भागानुसार प्रदेशाची वाटणी करून दिली.
बिन्यामीनचे वतन
11बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.
12उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती. 13तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली.
14तिथून ती सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनजवळील डोंगरावरून किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) मध्ये येते. यहूदीयाच्या लोकांच्या नगरांपैकी ते एक होते. ही पश्चिमी सीमा होती.
15दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्‍याकडे पोहोचली. 16तिथून ती खाली रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्‍याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली. 17मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते. 18ती सीमा पुढे बेथ-अराबाहच्या उत्तरेकडील उताराकडून खाली अराबाकडे गेली होती. 19पुढे ती सीमा बेथ-होगलाहच्या उत्तरेकडील उताराला जाऊन मृत समुद्राच्या उत्तरेच्या खाडीजवळ येते. ही यार्देन नदीच्या मुखाजवळील दक्षिण सीमा आहे.
20पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती.
बिन्यामीनच्या कुळांना मिळालेल्या वतनाच्या चारही बाजूने या सीमा होत्या.
21बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार मिळालेली नगरे ही होती:
यरीहो, बेथ-होगलाह, एमेक-केझीज, 22बेथ-अराबाह, सेमाराईम, बेथेल, 23अव्वीम, पाराह, ओफराह, 24कफर-अम्मोनी, ओफनी आणि गेबा; ही बारा नगरे आणि त्यांची गावे.
25गिबोन, रामाह, बैरोथ, 26मिस्पेह, कफीराह, मोजाह, 27रेकेम, यिरपएल, तरलाह, 28सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे.
बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार हे वतन होते.

सध्या निवडलेले:

यहोशुआ 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन