यहोशुआ 11
11
उत्तरेकडील राजांचा पराभव
1हासोराचा राजा याबीनने या घडलेल्या घटनांबद्दल ऐकले, तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचे व अक्षाफाचे राजे, 2व उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांचे सर्व राजे; किन्नेरेथाच्या दक्षिणेकडील अराबात असलेले राजे; तळवटीत असलेले राजे, पश्चिमेकडील नाफथ दोराच्या प्रदेशातील राजे; 3पूर्वेकडील व पश्चिमेकडील कनानी; अमोरी, हिथी, परिज्जी आणि डोंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना; आणि मिस्पाहच्या हर्मोन डोंगराच्या तळाशी राहणारे हिव्वी या सर्व लोकांना निरोप पाठवला. 4ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले. 5हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला.
6परंतु याहवेह यहोशुआला म्हणाले, “तू त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या यावेळेस मी त्यांना मृत झालेले इस्राएलच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ जाळून टाक.”
7तेव्हा यहोशुआ आणि त्याचे सैन्य अकस्मात मेरोम सरोवराजवळ दाखल झाले आणि त्यांनी हल्ला केला. 8याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही. 9मग याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे यहोशुआने त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाकल्या आणि त्यांचे सर्व रथ जाळून टाकले.
10परत येताना यहोशुआने हासोर शहर हस्तगत केले आणि तेथील राजाला तलवारीने ठार मारले. (हासोर शहर त्या सर्व संयुक्त राज्यांची राजधानी होती.) 11त्या शहरातील प्रत्येकाचा तलवारीने संहार करण्यात आला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा नाश केला आणि हासोर शहर जाळून टाकले.
12मग यहोशुआने ही सर्व राजकीय शहरे व त्यांच्या राजांवर हल्ले करून त्यांचा नाश केला. याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे सर्व लोकांची तलवारीने कत्तल करण्यात आली. 13इस्राएलने टेकड्यांवर वसलेल्या शहरांपैकी कोणतेही शहर जाळून टाकले नाही—फक्त हासोर, जे यहोशुआने जाळले. 14उद्ध्वस्त केलेल्या सर्व शहरातील लूट व गुरे इस्राएली लोकांनी स्वतःसाठी घेतली; परंतु सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांना तलवारीने मारले. त्यांनी कोणालाही जिवंत ठेवले नाही. 15कारण याहवेहने आपला सेवक मोशेला अशीच आज्ञा दिली होती; आणि मोशेने ही आज्ञा यहोशुआला दिली व यहोशुआने जसे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे केले; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे त्याने काळजीपूर्वक पालन केले.
16अशा रीतीने यहोशुआने हे सर्व देश जिंकून घेतले, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमी तळवट, अराबा आणि इस्राएलचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट, 17सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले. 18या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले. 19गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले. 20कारण याहवेहनेच इस्राएली लोकांशी युद्ध करण्यासाठी या राजांचे हृदय कठोर केले होते, अशासाठी की याहवेहने त्यांना काहीही दयामाया न दाखविता त्यांचा समूळ नाश करावा असे मोशेला आज्ञापिले होते. याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे काही दयामाया न दाखविता त्यांचा वध करण्यात आला.
21या काळामध्ये हेब्रोन, दबीर व अनाब येथील आणि यहूदीया व इस्राएलच्या सर्व डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकाच्या सर्व वंशजांचा यहोशुआने सर्वस्वी नायनाट केला आणि त्यांची शहरे संपूर्णपणे ओसाड केली. 22इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले.
23याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे यहोशुआने संपूर्ण प्रदेश घेतला; आणि इस्राएलाच्या गोत्रांच्या अनुसार विभागणी करून, त्यांचे वतन म्हणून तो इस्राएली लोकांस दिला. अशा रीतीने शेवटी देशास युद्धापासून विसावा मिळाला.
सध्या निवडलेले:
यहोशुआ 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.