इय्योब 5
5
1“आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार?
पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील?
2क्रोध मूर्खाचा घात करतो,
आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो.
3मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले,
परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.
4त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत,
वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही.
5त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात
काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात;
आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात.
6कारण कष्ट मातीतून वाढत नाही,
आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.
7खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात
तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.
8“मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती;
त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.
9आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे,
व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.
10ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात;
आणि शेतांवर पाणी पाडतात.
11नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात,
जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
12धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये,
म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,
13ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,
आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.
14दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो;
आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात.
15परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून;
व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.
16म्हणून दीन लोकांस आशा आहे,
आणि अन्याय आपले तोंड बंद करेल.
17“परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य;
म्हणून सर्वसमर्थाचे#5:17 मूळ भाषेत शद्दाय शासन तू तुच्छ मानू नको.
18कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्दा तेच बांधतात;
ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.
19सहा संकटातून ते तुला वाचवतील;
आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.
20दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील;
युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.
21जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील,
विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.
22विनाश व दुष्काळ यांना तू हसशील,
आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही.
23कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल,
आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.
24तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील;
तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.
25तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल,
आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील.
26जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात,
तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही.
27“हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे.
म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.”
सध्या निवडलेले:
इय्योब 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.