एलीहू पुढे म्हणाला: “अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे. माझे ज्ञान मला फार दुरून मिळते; माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन. ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे. “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत. दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात. न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात. परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत, आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत, त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे. ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात. जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली, तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील आणि संतृप्तीची वर्षे बघतील. परंतु जर ते ऐकणार नाहीत, तर तलवारीने ते नाश होतील आणि ज्ञाना अभावी मरण पावतील. “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही. त्यांच्या भर तारुण्यातच मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह ते मरण पावतात. परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात; त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात. “दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी, तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात. परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे; शिक्षा आणि न्याय यांनी तुझी पकड घेतली आहे. सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये; आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये. तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय? लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी, रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस. दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे, कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.
इय्योब 36 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इय्योब 36:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ