इय्योब 28
28
मानवाचा ज्ञानासाठी शोध
1चांदीसाठी खाण असते
आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते.
2लोखंड मातीतून घेतले जाते,
आणि दगड वितळून तांबे काढले जाते.
3मनुष्य अंधाराची कदर न करता;
खूप दूर त्या दाट अंधकारात
त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो.
4मनुष्यांच्या वसतीपासून दूर,
जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात;
व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात.
5पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते,
ती खाली अग्नीने पालटून गेली आहे;
6तिच्या खडकातून नीलमणी येतात,
आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात.
7कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही,
कोणत्याही बहिरी ससाण्याची नजर त्यावर पडली नाही.
8गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली,
ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला.
9गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात
आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.
10ते खडकामधून भुयारे तयार करतात;
आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.
11पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात
आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात.
12परंतु ज्ञान कुठे सापडेल?
आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
13मानवाला त्याचे मोल अवगत नाही;
जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.
14महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”;
आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.”
15अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही,
किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही.
16ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी,
यांनीही त्याचे मोल करता येणार नाही.
17सोने आणि रत्ने किंवा,
शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही.
18प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको;
ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे.
19कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही,
आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही.
20तर मग ज्ञान कुठून येते?
आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
21ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे,
आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे.
22विनाश आणि मृत्यू म्हणतात,
“की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.”
23परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो
ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे.
24कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात.
आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते.
25जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली
आणि जलांचे माप घेतले,
26जेव्हा त्यांनी पावसाला नियम,
आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला,
27तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले;
त्याची पुष्टी करून त्याची पारख केली.
28याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले,
“प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे,
वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”
सध्या निवडलेले:
इय्योब 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.