इय्योब 19
19
इय्योब
1मग इय्योबाने उत्तर देत म्हटले:
2“किती काळ तुम्ही मला त्रास देणार
आणि आपल्या शब्दांनी मला चिरडणार?
3एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून;
निर्लज्या सारखा तुम्ही माझ्यावर हल्ला केला.
4मी जर खरोखरच चुकलो असेन,
तरी त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार.
5जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता
आणि माझ्या या दैनावस्थेचा माझ्याविरुद्ध गैरउपयोग करता,
6तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे
आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.
7“मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही;
साहाय्यासाठी मी बोलावितो, परंतु मला न्याय मिळत नाही.
8मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे;
त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत.
9माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे
आणि माझ्या मस्तकावरील मुकुट काढून घेतला आहे.
10माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे;
झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे.
11त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे;
आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे.
12त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे;
त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे
आणि माझ्या डेर्या सभोवती वेढा घातला आहे.
13“माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत;
माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत.
14माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत;
माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे.
15माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात;
अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात.
16मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो,
आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.
17माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे;
माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे.
18लहान मुलेदेखील माझी निंदा करतात;
मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात.
19माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो;
ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले.
20मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे;
आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे.#19:20 किंवा केवळ हिरड्या बाकी आहेत
21“माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा,
कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.
22परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता?
माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?
23“अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती,
ते एका चर्मपत्राच्या गुंडाळीत लिहून ठेवले असते,
24लोखंडी कलमाने ते शिसावर,
किंवा कायम स्वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!
25मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,
आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;
26आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही,
आपल्या देहाशिवाय#19:26 देहाशिवाय इतर मूळ प्रतींमध्ये देहामध्ये मी परमेश्वराला पाहीन;
27होय, मी स्वतः त्यांना पाहीन
दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन.
त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!
28“आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू,
कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’
29तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे;
कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार,
आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल.#19:29 किंवा तुला सर्वसमर्थाची ओळख होईल”
सध्या निवडलेले:
इय्योब 19: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.