YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 46

46
इजिप्तविषयी भविष्य
1राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
2इजिप्तसंबंधी:
योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.
3“तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही,
आणि लढाईसाठी कूच करा!
4घोड्यांवर खोगीर चढवा,
आणि अश्वारूढ व्हा!
शिरस्त्राण घालून
मोर्चा बांधा!
भाल्यांना धार लावा,
व चिलखते चढवा!
5मी हे काय पाहात आहे?
ते भयभीत झालेले आहेत,
ते माघार घेत आहेत,
त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत.
मागे वळूनदेखील न पाहता
ते घाईघाईत पळत आहेत,
आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.
6“चपळ सैनिक पळू शकत नाहीत.
वा बलाढ्य निसटून शकत नाहीत.
उत्तरेकडे फरात नदीकाठी
ते अडखळून पडत आहेत.
7“नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे,
पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखा हा कोण आहे?
8इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे,
पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी.
ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन;
मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’
9अश्वांनो, तुम्ही हल्ला करा!
सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या!
योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक,
लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!
10कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे—
हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे.
रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत
तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील.
कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.
11“हे इजिप्तच्या कुमारिके,
वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण.
तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस,
पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.
12राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील;
तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल.
तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील;
दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”
13यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:
14“इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा;
मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा!
‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा,
कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’
15तुमचे योद्धे कोलमडून का पडले?
ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.
16ते पुन्हापुन्हा अडखळतील;
ते एकमेकांवर कोसळून पडतील.
ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत
आपण परत जाऊ,
या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’
17तिथे ते उद्गारतील,
‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे;
त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’
18“ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे,
ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’
जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा,
समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.
19इजिप्तमधील रहिवाशांनो,
सामानाची बांधाबांध करा,
कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे
व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल.
20“इजिप्त ही सुंदर कालवड आहे;
परंतु उत्तरेकडून तिच्याविरुद्ध
गांधीलमाशी येत आहे.
21तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक
एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत.
तेही वळून एकत्र पलायन करतील,
ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही,
कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे,
त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.
22जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील,
जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर
ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील.
तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल;
23याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल
ते कापून नष्ट करतील.
ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील,
ज्यांची संख्या मोजता येणार नाही.
24उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या
इजिप्तच्या कुमारिकेची लज्जा घालविण्यात येईल.”
25सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे. 26त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.
27“याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको;
इस्राएला, निराश होऊ नका.
मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा
दूर देशातून तुमचा बचाव करेन,
याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल,
त्याला कोणीही भयभीत करणार नाही.
28याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको,
कारण मी तुझ्याबरोबर आहे.”
असे याहवेह जाहीर करतात.
“मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते,
त्या राष्ट्रांचा जरी नाश केला,
परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन.
तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 46: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन