यिर्मयाह 17
17
1“त्यांच्या हृदय पटलावर
आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर
यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने
एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,
2घनदाट वृक्षाजवळ
आणि उंच डोंगरावरील,
प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची
त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात.
3या भूमीवर माझे उंच पर्वत
आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे
तुमच्या उच्च स्थळासहित,
लूट म्हणून मी देईन,
कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे.
4तुमच्याच चुकीमुळे
मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल.
तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत
मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन.
कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे
आणि तो सतत जळत राहील.”
5याहवेह असे म्हणतात:
“जो मनुष्यावर विश्वास ठेवतो,
जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो
आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.
6तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे;
उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत.
ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये,
ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.
7“परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो,
जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,
8ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत.
त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात.
या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही;
त्याची पाने सदा हिरवी राहतात.
अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही.
आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”
9सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण
आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे.
हे कळण्यास कोण समर्थ आहे?
10“मी याहवेह, अंतःकरणे पारखतो,
आणि मनाची परीक्षा घेतो,
म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे,
प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.”
11तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो
अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात.
अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते,
आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.
12तुमचे गौरवी सिंहासन प्रारंभापासून उच्च आहे,
हेच आमचे आश्रयस्थान आहे.
13हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात;
ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील.
जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल
कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला,
जिवंत पाण्याच्या झर्याला सोडले आहे.
14हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन;
माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन,
कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो.
15ते मला सतत म्हणत असतात,
“याहवेहचे वचन कुठे आहे?
ते आता पूर्ण होऊ द्या!”
16मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही;
तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती.
माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे.
17माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका;
संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात.
18माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा,
परंतु मला फजिती पासून सोडवा;
त्यांना भयभीत करा
परंतु मला भय मुक्त करा.
त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे;
त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.
शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळणे
19याहवेह मला असे म्हणाले: “जा आणि लोकांच्या#17:19 किंवा सैन्यांच्या प्रवेश दारावर उभा राहा. ज्या प्रवेश दारांनी यहूदीयाचा राजा प्रवेश करतो; आणि यरुशलेमच्या इतर सर्व प्रवेश दाराशी जाऊन उभा राहा. 20लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता, 21याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका. 22शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती. 23परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते. 24याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात, 25तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील. 26तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील. 27परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 17: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.