गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.” गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले, तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला. जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!” परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.” म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे. त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्या अशेरा देवीचा खांब तोडून टाक. नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्हा अर्पण कर.” यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले. दुसर्या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्या गोर्ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले! ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.” योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.”
शास्ते 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 6:17-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ