गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती. गिलआदाच्या पत्नीने सुद्धा त्याच्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला हाकलून दिले. ते त्याला म्हणाले, “आमच्या पित्याच्या वतनातून तुला काहीही मिळावयाचे नाही, कारण तू दुसर्या स्त्रीचा पुत्र आहेस.” म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले.
काही वेळानंतर, अम्मोनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करू लागले. जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले. त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.”
गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?”
गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.”
गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?”
गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.” तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले.
नंतर इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूत पाठवून प्रश्न केला: “तुला माझ्याविरुद्ध काय तक्रार आहे की तू माझ्या देशावर हल्ला केला?”
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”
इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूतांना परत पाठवले म्हणाला:
“इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही. परंतु जेव्हा इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले, त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला आणि कादेश या ठिकाणी आले. तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले.
“नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.
“नंतर इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’ त्यांना त्याच्या सीमेतून जाऊ द्यावे असा विश्वास सीहोन राजाने इस्राएलवर ठेवला नाही. त्याने आपले सर्व सैन्य गोळा केले आणि याहसाह येथे तळ दिला आणि इस्राएलाशी युद्ध केले.
“नंतर याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने सीहोन व त्याचे सर्व सैन्य इस्राएलाच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा पराभव केला. त्या देशात राहणार्या अमोरी लोकांचा सर्व देश इस्राएलने घेतला, आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्यांचा सर्व प्रदेश काबीज केला.
“याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे? तुझे दैवत कमोशने तुला काही वतन दिले, तर ते तू आपल्या ताब्यात ठेवणार नाहीस का? तसेच याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला जे वतन म्हणून देत आहे, ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेवू. सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय? तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही? मी तुझ्याविरुद्ध काही अपराध केलेला नाही, उलट तूच माझ्याशी लढण्यासाठी येऊन माझ्यावर अन्याय करीत आहेस. याहवेह जे न्यायी आहेत, ते इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांच्यामध्ये आज न्याय करोत.”
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाने पाठविलेल्या संदेशाकडे अजिबात लक्ष दिले नाही.