यशायाह 5
5
द्राक्षमळ्याचे गीत
1माझी ज्यांच्यावर प्रीती आहे
त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन:
सुपीक डोंगराळ भागावर
माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.
2त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले
आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले.
त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला
आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला.
नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली,
परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.
3“आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो,
मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.
4माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे
त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो?
मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली,
तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?
5आता मी तुम्हाला सांगेन,
मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे:
मी त्याचे कुंपण काढून टाकेन,
आणि त्याचा नाश होईल;
मी त्याची भिंत पाडेन,
आणि ते तुडविले जाईल.
6मी ती जमीन उजाड करेन,
तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही,
आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील.
मी ढगांना आज्ञा देईन की,
त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”
7इस्राएल राष्ट्र
सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे,
आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत,
ज्यामध्ये त्यांना आनंद होतो.
आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला;
नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.
धिक्कार व न्याय
8तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता,
आणि जोपर्यंत जागा संपत नाही
शेताला शेत जोडून घेतात,
आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.
9माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे:
“मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील,
उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.
10दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ#5:10 अंदाजे 22 लीटर द्राक्षारस निघेल;
एक होमेर#5:10 अंदाजे 160 कि.ग्रॅ. बियाणे फक्त एक एफा#5:10 अंदाजे 16 कि.ग्रॅ. धान्याचे पीक देईल.”
11जे सकाळी लवकर उठतात
व मद्यप्राशनाकडे धाव घेतात,
रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत
जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!
12त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत,
वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे,
परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही.
याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.
13म्हणून असमजंसपणामुळे
माझे लोक बंदिवासात नेले जातील;
उच्च पदावरील लोक भुकेने मरतील
आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.
14म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो,
त्याचे तोंड मोठे करून उघडतो.
त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह,
त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.
15म्हणून लोकांची अधोगती होईल
आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल,
गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.
16परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील,
आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.
17तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील;
श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.
18धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात,
आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.
19धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या;
त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या
म्हणजे आपल्याला ते पाहता येईल.
इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना—
ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या,
म्हणजे आम्हाला ती कळेल.”
20धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात
आणि चांगल्याला वाईट म्हणतात,
जे अंधाराला प्रकाश
आणि प्रकाशाला अंधार,
जे गोड त्याला कडू
आणि कडू त्याला गोड असे म्हणतात.
21धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत
आणि स्वतःच्या नजरेत हुशार आहेत.
22धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत
आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,
23लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात,
परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.
24म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात
आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते,
तशीच त्यांची मुळे कुजून जातील,
आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील;
कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे
आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.
25म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे;
त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात.
पर्वत डगमगतात,
आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत.
हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही,
त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
26दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात,
पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात.
हे बघा ते आले,
तत्काळ आणि वेगाने!
27त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही,
एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही;
एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही,
एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.
28त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत,
त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत;
त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात,
त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.
29त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे,
तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात;
ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात,
आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.
30त्या दिवशी ते त्याच्यावर
समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील.
आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर,
तिथे फक्त अंधार आणि संकट आहे;
ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.
सध्या निवडलेले:
यशायाह 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.