“याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे— पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता आणि इस्राएलाच्या परमेश्वरावर अवलंबून असल्याची फुशारकी मारता— ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे: भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले. तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत. याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’ ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो. त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे; आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत. तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’ तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत; पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत. कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात; जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले. तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही. पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली. तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.
यशायाह 48 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 48:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ