YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 46

46
बाबेलची दैवते
1बेल नतमस्तक होतो, नबो#46:1 बाबेलच्या दैवतांची नावे वाकून जातो;
ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात.
या प्रतिमांची नेआण तापदायक,
व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.
2ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात;
हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे,
ते स्वतःच बंदिवासात जातात.
3“याकोबाच्या वंशजांनो,
इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका,
तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे,
आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.
4वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत
तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल.
मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन;
मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.
5“तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल?
तुम्हाला माझ्यासारखा असा कोण आढळेल, ज्याच्याशी तुम्ही माझी तुलना कराल?
6काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात
व चांदी तराजूत तोलतात;
ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात,
आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.
7ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात;
नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते.
त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही.
कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही;
ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.
8“बंडखोरांनो, हे लक्षात ठेवा, विसरू नका,
हे जरा मनावर घ्या.
9भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करा, फार पुरातन काळातील गोष्टी;
मी परमेश्वर आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही नाही;
मी परमेश्वर आहे आणि माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.
10मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो
व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो.
मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील,
आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’
11मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला,
त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन.
जे मी बोललो, ते मी घडवून आणणार;
जे मी योजले आहे, ते मी करेनच!
12अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो,
तुम्ही, जे आता माझ्या नीतिमत्वापासून फार दूर गेलेले आहात, माझे ऐका.
13मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे,
ते फार दूर नाही;
आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही.
मी माझे तारण सीयोनाला
माझे वैभव इस्राएलला बहाल करेन.

सध्या निवडलेले:

यशायाह 46: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन