तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा:
“ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस? तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस? पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते. पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय?”
“ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तुमच्याकडे त्यांच्यासाठी तेवढे घोडेस्वार असतील तर! रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार? शिवाय, मी याहवेहशिवाय या भूमीवर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशाविरुद्ध चाल करून येण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ”
तेव्हा एल्याकीम, शेबना आणि योवाह सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”
परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”
मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरचे महाराज यांचे ऐका! महाराज असे म्हणतात: हिज्कीयाहास तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका, जेव्हा तो म्हणेल, ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवितील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’
“हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे महराज असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल, जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या देशात घेऊन जाईपर्यंत.
“हिज्कीयाहला तुमची दिशाभूल करू देऊ नका जेव्हा म्हणतो की, ‘याहवेह आम्हाला सोडवतील.’ कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईमची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय? या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्यांच्या देशांना माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”
परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.”
यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.