YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 34

34
राष्ट्रांविरुद्ध न्यायनिवाडा
1अहो तुम्ही सर्व राष्ट्रांनो, जवळ या आणि ऐका;
लोकांनो! तुम्ही इकडे लक्ष द्या!
पृथ्वी आणि तिच्यामध्ये असणाऱ्या सर्वांना हे ऐकू द्या,
जग आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्वांना ऐकू द्या!
2याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत;
त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे.
ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील,
ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.
3त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल,
त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल;
पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील.
4आकाशातील सर्व तारे विरघळून जातील
आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील;
द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे,
अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे
सर्व तारांगण गळून पडतील.
5माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे.
पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे,
त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.
6याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे,
ती चरबीने झाकलेली आहे—
कोकरे आणि शेळ्यांचे रक्त,
मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे.
कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे
आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.
7आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि
गोर्‍हे व मोठे बैल यज्ञात पडतील.
त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल,
आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल.
8कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे,
सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.
9एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील,
तिची धूळ जळत्या गंधकात बदलली जाईल.
तिची भूमी धगधगते मैदान होईल!
10रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही.
त्याचा धूर कायमचा उठत राहील.
पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील.
यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.
11ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील;
मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील.
कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर
मापनदोरी ताणली आहे
आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.
12तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही,
तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.
13काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील,
जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील.
कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल,
घुबडांचे घर होईल.
14वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील,
आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील;
तिथे निशाचरही झोपतील
आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील.
15तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल,
ती तिच्या पंखाच्या सावलीत
त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल;
तिथे प्रत्येक बाज पक्षीही
आपल्या जोडीदारासह जमतील.
16याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा:
यामधील कोणाचाही अभाव होणार नाही,
एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही.
कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे,
आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.
17ते त्यांच्या भागांचे वाटप करतात;
त्यांच्या हाताने त्यांना मोजून वाटतात.
तो भाग सर्वकाळासाठी त्यांच्याकडे राहील
आणि ते पिढ्यान् पिढ्या तिथे निवास करतील.

सध्या निवडलेले:

यशायाह 34: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन