YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 30

30
दुराग्रही राष्ट्राचा धिक्कार असो
1याहवेह असे घोषित करतात,
“दुराग्रही संततीचा धिक्कार असो,
ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात,
नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही,
पापावर पापाचा ढीग रचतात;
2जे माझा सल्ला न घेता
इजिप्तकडे जातात;
जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची
फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.
3परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल,
इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.
4जरी सोअनमध्ये त्यांचे अधिकारी आहेत
आणि त्यांचे दूत हानेस येथे पोहोचले आहेत,
5तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल
कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत,
जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत.
परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”
6नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी:
कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून,
सिंह आणि सिंहीण,
फुरसे आणि उडणारे साप,
दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर,
त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून,
त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,
7इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत.
म्हणून मी इजिप्तला
निरुपयोगी राहाब#30:7 किंवा समुद्रात गोंधळ करणारा पुरातन साहित्यातील काल्पनिक समुद्रीराक्षस म्हणतो.
8आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा,
चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका,
म्हणजे येणाऱ्या दिवसात
ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.
9कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत,
याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.
10दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात,
“यापुढे दृष्टान्त पाहू नका!”
आणि संदेष्ट्यांना म्हणतात,
“यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका!
आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा,
भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.
11हा मार्ग सोडा,
या वाटेवरून दुसरीकडे जा,
आणि इस्राएलचे जे पवित्र परमेश्वर आहेत
त्यांच्याबरोबर आमची समोरासमोर भेट करणे थांबवा!”
12त्यामुळे इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
“कारण तुम्ही हा संदेश नाकारला,
जुलूम करण्यावर भरवसा ठेवला
आणि कपट करण्यावर अवलंबून राहिला,
13हे पाप तुमच्यासाठी
उंच, भेगा पडलेल्या आणि फुगलेल्या भिंतीसारखे,
जी अचानक, क्षणार्धात कोसळते अशी होईल.
14मातीच्या भांड्यांसारखे त्याचे
इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील
की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये
चुलीमधून निखारे घेण्यासाठी
किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.”
15सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
“पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे,
शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे,
परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.
16तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’
म्हणून तुम्ही पळून जाल!
तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’
म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!
17जोपर्यंत तुम्हाला
डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे,
टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे
सोडून दिले जात नाही तोपर्यंत
एका व्यक्तीच्या धमकीने
एक हजार लोक पळून जातील;
पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”
18तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात;
त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील.
कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत.
धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!
19यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील. 20जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. 21तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.” 22मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
23तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील. 24शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील. 25त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील. 26जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.
27पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर,
याहवेहचे नाव फार लांबून येत आहे;
त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत,
आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.
28त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे,
तो गळ्यापर्यंत वर येतो.
ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात;
ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात
जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो.
29आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता
त्याप्रमाणे तुम्ही गाणी गाल;
जेव्हा लोक बासरी वाजवित
याहवेहच्या पर्वताकडे वर
इस्राएलच्या खडकाकडे जातात,
तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील.
30याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील
आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने,
ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर
त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.
31याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल;
ते त्यांच्या काठीने त्यांना तडाखा देतील.
32याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने
त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार
डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल,
जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात.
33तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे;
ते राजासाठी तयार केलेले आहे.
त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे,
त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे;
जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा,
याहवेहचा श्वास
ते पेटवितो.

सध्या निवडलेले:

यशायाह 30: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन