YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 3

3
यहूदीया व यरुशलेम यांचा न्याय
1आता बघा, प्रभू
सर्वसमर्थ याहवेह
यरुशलेम व यहूदीयाचा
अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत—
सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,
2वीर योद्धे तथा सैनिक,
न्यायाधीश आणि संदेष्टे,
दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन,
3पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी,
सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक
या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत.
4“मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन;
बालके त्यांच्यावर राज्य करतील.”
5लोक एकमेकांवर अत्याचार करतील—
पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी.
तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील,
मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.
6एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात,
आपल्या भावास धरून म्हणेल,
“भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो;
या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”
7पण त्या दिवशी तो ओरडेल,
“माझ्याकडे त्याचा इलाज नाही.
माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत;
मला लोकांचा पुढारी बनवू नका.”
8यरुशलेम डगमगत आहे,
यहूदीया कोसळत आहे;
त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत,
त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.
9त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात;
त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात;
ते लपवित नाहीत.
त्यांचा धिक्कार असो!
त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.
10परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल.
त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.
11दुष्टांचा धिक्कार असो!
अरिष्ट त्यांच्यावर येत आहे!
त्यांनी केलेल्या कृत्याचा,
त्यांना मोबदला मिळणार.
12तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात,
स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात.
माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात;
ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.
13याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात;
ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात.
14त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी
याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात:
“तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे;
गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.
15माझ्या लोकांना चिरडण्याचे
व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?”
प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
16याहवेह म्हणतात,
“सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत,
त्या मान उडवीत चालतात,
चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात,
पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत,
कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.
17म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार;
याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”
18त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार, 19त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण, 20त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत, 21अंगठ्या आणि नथण्या, 22उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे, 23त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.
24सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल;
कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल;
नीट केशरचनेऐवजी टक्कल;
उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट;
आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.
25तुमचे पुरुष तलवारीने पडतील,
तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,
26सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील;
ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.

सध्या निवडलेले:

यशायाह 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन