YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 10

10
1त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात—
जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,
2गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी
आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी,
विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी
आणि अनाथांना लुटण्यासाठी.
3दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल,
जेव्हा फार दुरून संकट येईल?
तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात?
तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?
4बंदिवानांमध्‍ये लपून बसणे,
किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही.
हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही,
त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
परमेश्वर अश्शूरचा न्यायनिवाडा करतात
5“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे,
ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!
6मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो,
मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो,
त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी,
आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.
7परंतु हा त्याचा उद्देश नाही,
त्याच्या मनात हे नाही;
त्याचा उद्देश आहे की नाश करावा,
अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.
8‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
9‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय?
हमाथ अर्पादसारखा
आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?
10जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली,
अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—
11शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला
तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”
12जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन. 13कारण ते म्हणतात:
“ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे,
आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे.
मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या,
मी त्यांचे खजिने लुटले;
एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.
14जसा कोणी घरट्यात पोहोचतो,
तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला.
जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात,
तसे मी सर्व देशांना एकत्र केले;
कोणीही पंख फडफडविला नाही,
किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”
15जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय,
किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय?
जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय,
किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!
16म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील;
त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल
अग्नी प्रज्वलित केला जाईल.
17इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल,
त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील;
त्याचे काटे आणि काटेरी झुडपे
ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.
18ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो
त्याप्रकारे त्याच्या जंगलांचे आणि सुपीक शेत जमिनींचे वैभव,
ते पूर्णपणे नष्ट करतील.
19आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की,
एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल.
इस्राएलचे अवशिष्ट लोक
20त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट,
जिवंत राहिलेले याकोबाचे लोक,
ज्याने त्यांना मारून टाकले
त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत,
परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर
ते खरोखरच भरवसा ठेवतील.
21याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल,
सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.
22हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी,
उरलेलेच मात्र परत येतील.
नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
परिपूर्ण आणि न्याययुक्त.
23प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील.
24म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“माझे लोकहो, जे तुम्ही सीयोनमध्ये राहता,
अश्शूरी लोकांना घाबरू नका,
जे तुम्हाला दांडक्याने मारतात.
आणि इजिप्तने केले त्याप्रमाणे तुमच्याविरुद्ध सोटा उगारतात.
25तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल
आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.”
26सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील,
जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते;
आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील,
जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.
27त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून,
त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल.
तुमच्या खांद्यावरून
जू तुटले जाईल.#10:27 किंवा कारण तुमची चरबी वाढली आहे
28ते अयाथमध्ये प्रवेश करतात;
ते मिग्रोनमधून पुढे जातात;
ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात.
29ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात,
“आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.”
रामाह थरथर कापतो;
शौलाचा गिबियाह पळून जातो.
30गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा!
ऐक, लईशाह!
गरीब बिचारा अनाथोथ!
31मदमेनाह पळून गेला आहे;
गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत.
32आज ते नोब येथे थांबतील;
सीयोन कन्येच्या डोंगराकडे,
यरुशलेमच्या टेकडीकडे
ते त्यांच्या मुठी वळवतील.
33हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
मोठ्या सामर्थ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या छाटून टाकतील.
भव्य झाडे पाडली जातील,
उंच झाडे खाली आणली जातील.
34ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील;
लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल.

सध्या निवडलेले:

यशायाह 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन