होशेय 9
9
इस्राएलास शासन
1हे इस्राएला, आनंद करू नकोस;
इतर राष्ट्रांसारखे उल्लासू नकोस,
कारण तू तुझ्या परमेश्वराशी अविश्वासू झाला आहेस;
धान्याच्या प्रत्येक खळ्यावर
वेश्याव्यवसाय करून मिळणारी कमाई तुला आवडते.
2खळे आणि द्राक्षकुंड लोकांना खाऊ घालणार नाही;
नवा द्राक्षारस त्यांना दगा देईल.
3याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत;
एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल
आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.
4ते याहवेहला द्राक्षारसाची पेयार्पणे करू शकणार नाही,
किंवा त्यांच्या यज्ञार्पणाने याहवेहला संतोष होणार नाही.
कारण असे यज्ञ त्यांच्यासाठी शोक करणाऱ्यांच्या अन्नासारखे होईल;
त्यास खाणारे सर्वजण अमंगळ होतील.
ते भोजन त्यांच्यासाठीच असेल;
ते याहवेहच्या मंदिरात आणता येणार नाही.
5मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी,
याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील?
6जरी ते नाशापासून सुटले तरी
इजिप्त त्यांना गोळा करेल,
आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील.
काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील,
आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.
7शासन करण्याची वेळ जवळ आली आहे;
प्रतिफळ घेण्याचे दिवस जवळ आले आहेत.
इस्राएलला हे समजून यावे.
कारण तुमची पापे अधिक आहेत
आणि तुमचे शत्रुत्व जास्त आहे,
संदेष्टा मूर्ख ठरत आहे,
प्रेरित वेडा समजला जातो.
8संदेष्टा माझ्या परमेश्वरासोबत,
एफ्राईमचा पहारेकरी आहे,
तरीही त्याच्या सर्व मार्गात सापळा त्याची वाट पाहत आहे,
आणि परमेश्वराच्या भवनात शत्रुत्व आहे.
9जसे गिबियाहमधील दिवसात केले
तसे त्यांनी स्वतःला अधिक भ्रष्ट केले आहे.
परमेश्वर त्यांचे दुष्कर्म स्मरणात ठेवतील
आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करतील.
10“जेव्हा मला इस्राएल आढळला,
तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते;
जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले,
ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते.
पण जेव्हा ते बआल-पौराला आले
तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले
आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.
11एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल—
जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही.
12जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले,
तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन.
मी त्या लोकांपासून निघून जाईन,
तेव्हा त्यांचा धिक्कार असो.
13सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला,
तसाच एफ्राईम आहे,
परंतु एफ्राईम आपल्या मुलांना
वध करणार्याकडे घेऊन येईल.”
14हे याहवेह, त्यांना द्या—
तुम्ही त्यांना काय द्याल?
त्यांना वांझ गर्भाशये
आणि शुष्क स्तने द्या.
15“गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत,
मी त्यांचा तिथेच द्वेष केला.
त्यांच्या पापी कृत्यांमुळे,
मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन.
मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही;
त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.
16एफ्राईम नाश पावला आहे.
त्यांची मुळे सुकून गेली आहेत.
ते फळ देत नाही.
जरी ते मुलांना जन्म देतील,
तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.”
17माझा परमेश्वर त्यांना नाकारील
कारण त्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही;
ते देशादेशातून भटकत राहतील.
सध्या निवडलेले:
होशेय 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.