होशेय 13
13
इस्राएलविरुद्ध याहवेहचा संताप
1जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत;
कारण तो इस्राएलाचा अधिपती होता.
पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला.
2आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत;
ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात,
हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा,
त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत.
या लोकांबद्दल असे म्हटले जाते,
“हे नरबली देतात!
ते वासराच्या मूर्तीचे चुंबन#13:2 किंवा यज्ञ करणारे पुरुष घेतात!”
3म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे,
पहाटेच्या लवकर उडून जाणार्या दहिवरासारखे,
खळ्यातून उडून जाणार्या भुशासारखे,
धुराड्यातून निघणार्या धुराप्रमाणे होतील.
4“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे;
माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस,
माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.
5मी रानात, त्या तप्त उष्णतेच्या प्रदेशात,
तुझी काळजी वाहिली.
6जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले;
जेव्हा ते तृप्त झाले तेव्हा ते गर्विष्ठ झाले;
नंतर ते मला विसरले.
7म्हणून मी त्यांच्यासाठी सिंहासारखा होईन,
चित्त्यासारखा त्यांच्या वाटेवर दबा धरून बसेन.
8जिची पिल्ले हरण केली आहेत, अशा अस्वलीप्रमाणे
मी त्यांच्यावर हल्ला करेन आणि त्यांचे तुकडे तुकडे करेन;
मी त्यांना सिंहाप्रमाणे फाडून टाकेन—
वनपशू त्यांना फाडून टाकतील.
9“हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे,
कारण तू माझ्याविरुद्ध, तुझ्या साहाय्यकर्त्यांच्या विरुद्ध आहेस.
10तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे?
‘मला राजा व राजपुत्र द्या’
ज्यांच्याबद्दल तू असे म्हटले होते,
ते तुझे सर्व नगरांचे अधिकारी कुठे आहेत?
11म्हणून माझ्या रागात मी तुला राजा दिला
आणि माझ्या क्रोधात त्याला मी काढून टाकले आहे.
12एफ्राईमची पातके जमा केली आहेत,
त्याची पापे साठवून ठेवली आहेत.
13बाळंतपणात स्त्रीला होणारा त्रास त्याला होईल,
पण तो बुद्धी नसलेला एक बालक आहे;
जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा
त्याला गर्भातून बाहेर येण्याचे ज्ञान नसते.
14“मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन;
मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन.
अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे?
हे कबरे, तुझा नाश कुठे आहे?
“मला काहीही कळवळा येणार नाही,
15जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता,
परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल,
तो वाळवंटातून येईल;
त्याचे झरे सुकून जातील
आणि त्याची विहीर कोरडी पडेल.
त्याच्या भांडारातील
सर्व खजिना लुटला जाईल.
16शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे,
कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले.
ते तलवारीने पडतील;
त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील,
आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”
सध्या निवडलेले:
होशेय 13: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.