ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती. जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले. आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि माझे मार्ग त्यांना ठाऊक नाहीत. मी रागाने स्वतःला शपथेने बद्ध करून घेतले की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ” बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा. अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही. जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे. ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का? आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली? ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत त्यांना नाही तर कोणाला बोलत होते? आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.
इब्री 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 3:7-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ