YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:20-40

इब्री 11:20-40 MRCV

विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला. याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असतानाही उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व विश्वासाने प्रार्थना करून योसेफाच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला. जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली! विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले. म्हणूनच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या ज्येष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे. विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली. विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही. तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत मिळाले. पण दुसर्‍या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्यात आले. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्‍याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते. हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहेत आणि बिळात राहत असत. या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत; कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती.