बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण झाले आहे, ते देहवासना पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर प्रीतिने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करण्यासाठी झाले आहे. कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.” तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्याकाही गोष्टी तुम्हाला करावयास पाहिजे त्या तुम्ही करू नये. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा, मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट, हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
परंतु आत्म्याची फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.