YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 31

31
लबानोनच्या तुटलेल्या गंधसरूप्रमाणे फारोह
1अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग:
“ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते?
3अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला,
ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत;
तो सर्वात उंच वाढून,
त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.
4पाण्याने त्याला पोषण दिले,
खोल झर्‍यांनी त्याला उंच वाढवले;
त्याचे प्रवाह
त्याच्या सभोवार वाहिले
आणि त्याच्या धारा
रानातील सर्व झाडांपर्यंत पाठविल्या.
5म्हणून रानातील इतर सर्व झाडांपेक्षा;
ते उंच वाढले.
विपुल पाण्यामुळे
त्याच्या डहाळ्या पसरल्या
व त्याच्या फांद्या लांब वाढल्या.
6आकाशातील सर्व पक्ष्यांनी
त्याच्या फांद्यांमध्ये घरटी केली,
जंगलातील प्राणी
त्याच्या फांद्यांखाली आपल्या पिलांना जन्म देत असत;
सर्व महान राष्ट्रे
त्याच्या छायेत राहिली.
7आपल्या पसरलेल्या फांद्या
आणि वैभवाने तो सुंदर होता,
कारण त्याची मुळे
विपुल पाण्याकडे पोहोचली होती.
8परमेश्वराच्या बागेतील देवदारू
त्याच्याशी तुलना करू शकत नसे,
गंधसरू त्याच्या फांद्यांची
बरोबरी करू शकली नाही,
ना अर्मोनवृक्षाची
त्याच्या डहाळ्यांशी तुलना झाली;
परमेश्वराच्या बागेतील कोणतेही वृक्ष
त्याच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नव्हते.
9पुष्कळ फांद्यांनी
मी त्याला सुंदर बनविले,
परमेश्वराच्या बागेतील,
एदेन बागेतील झाडे त्याचा हेवा करीत असत.
10“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला, 11त्याच्या दुष्टतेनुसार त्याला वागवावे म्हणून मी त्याला राष्ट्रांच्या अधिपतींच्या हातात दिले. मी त्याला सोडून दिले आहे, 12आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्‍यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्‍यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले. 13सर्व पक्षी पडलेल्या झाडावर वस्ती करू लागले आणि सर्व जंगली जनावरे त्याच्या फांद्यांमध्ये राहू लागले. 14म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.
15“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले. 16गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले. 17मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले.
18“ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील.
“ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 31: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन