YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 22:17-31

यहेज्केल 22:17-31 MRCV

तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही सर्वजण गाळ असे झाला आहात, म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये एकत्र करेन. जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन. मी तुम्हाला एकत्र करेन व तुमच्यावर माझा क्रोधाग्नी फुंकेन, आणि तुम्ही त्या शहरात वितळून जाल. जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ” याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’ तिच्यातील राजपुत्रांचा एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्‍या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात. तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात. तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात. त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात. “या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही. म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

यहेज्केल 22 वाचा