YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 16

16
यरुशलेम एका व्यभिचारी पत्नीसमान
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, यरुशलेमच्या अमंगळ कृत्यांबद्दल तिचा विरोध कर 3आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती. 4तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते. 5तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती.
6“ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!” 7शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस.
8“ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
9“ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले. 10तुला मी नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली आणि उत्तम चामड्याची पायतणे चढविली. तुझ्यावर मी उत्तम रेशमी कपडे व भरजरी वस्त्रे पांघरली. 11मी तुला दागिन्यांनी सजविले: मी तुझ्या हातांवर बांगड्या व गळ्यात साखळी घातली, 12आणि मी तुझ्या नाकात नथ, कानात कुंडली आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदर मुकुट घातला. 13याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस. 14तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
15“ ‘परंतु तू आपल्याच सौंदर्यावर भरवसा केला आणि वेश्या होण्यास आपल्या सौंदर्याचा उपयोग केला. जे कोणी तुझ्या वाटेने गेले त्यांना तुझ्या सौंदर्याने तू भुरळ घातली आणि तुझे सौंदर्य त्याचे झाले. 16आपली काही वस्त्रे घेऊन त्यांची भडक उच्च पूजास्थाने तू बनविली, तिथे तू आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला. तू त्याच्याकडे गेलीस आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कब्जा केला. 17मी तुला दिलेले उत्तम दागिने तू घेतले, दागिने जे माझ्या सोन्याचांदीचे बनले होते, ते घेऊन तू त्याच्या पुरुषमूर्ती बनविल्या आणि त्यांच्याशी वेश्यावृत्ती करू लागली. 18तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले. 19मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
20“ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय? 21माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला. 22तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही.
23“ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर, 24तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले. 25प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला. 26मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला. 27यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे. 28तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही. 29तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन#16:29 किंवा खास्दी जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.
30“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो#16:30 किंवा तुझे ह्रदय किती तापट आहे! 31तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला.
32“ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात! 33प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस. 34म्हणून तुझ्या वेश्या व्यवसायाबाबत तू इतरांपेक्षा वेगळी आहेस; तू आवडते म्हणून कोणीही तुझ्यामागे धावत नाही. तू अगदी वेगळी आहेस, कारण तू वेतन देतेस आणि तुला काही मिळत नाही.
35“ ‘म्हणून हे वेश्या, याहवेहचे वचन तू ऐक! 36सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू तुझी वासना ओतली आणि स्वैरपणाने तुझ्या प्रियकरांसमोर तुझे नग्न शरीर उघडे केले आणि तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे आणि तू तुझ्या लेकरांचे रक्त सांडले, 37यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील. 38ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन. 39तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील. 40ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील. 41ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस. 42तेव्हा तुझ्यावरचा माझा कोप शांत होईल आणि माझा ईर्ष्येचा क्रोध निघून जाईल; मी शांत होईन व आणखी रागावणार नाही.
43“ ‘तू आपल्या तारुण्यातील दिवसांची आठवण केली नाहीस तर ज्या सर्व कृत्यांनी मला चिडविले, तू केलेल्या कृत्यांचे प्रतिफळ मी खचितच तुझ्या माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये अश्लीलतेची भर घातली नाही काय?
44“ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.” 45तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्‍याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता. 46शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे. 47तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस. 48सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत.
49“ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही. 50त्या उन्मत्त असून माझ्यासमोर त्यांनी अमंगळ कृत्ये केली. म्हणून मी त्यांना माझ्यापासून दूर केले ते तर तू पाहिलेच आहे. 51शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे. 52आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.
53“ ‘तथापि, सदोम व तिच्या मुलींची संपत्ती मी पुनर्स्थापित करेन आणि शोमरोन व तिच्या मुली व त्यांच्याबरोबर तुझीही संपत्ती पुनर्स्थापित करेन, 54यासाठी की त्यांचे सांत्वन करताना तू तुझा कलंक वाहून घेशील आणि तू केलेल्या कृत्यांची तुला लाज वाटेल. 55तुझ्या बहिणी सदोम व तिच्या मुली आणि शोमरोन व तिच्या मुली, त्यांच्या पूर्वस्थितीत परत जातील; आणि तू व तुझ्या मुली सुद्धा तुमच्या पूर्वस्थितीत परत जाल. 56-57तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या#16:56‑57 किंवा एदोमाच्या कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले. 58तुझ्या अश्लील व अमंगळ कृत्यांचे परिणाम तू भोगशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
59“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू ज्यास पात्र आहेस, तसा व्यवहार मी तुझ्याशी करेन, कारण करार मोडून तू माझी शपथ तुच्छ मानली आहेस. 60तरीही तुझ्या तारुण्याच्या दिवसांत मी तुझ्याशी केलेला करार मी स्मरण करेन आणि तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार मी स्थापित करेन. 61आणि तुझ्यापेक्षा थोरल्या व धाकट्या बहिणींचे तू स्वागत करशील, तेव्हा तुला तुझे मार्ग आठवतील व तुला लाज वाटेल. तुझ्याबरोबरच्या माझ्या करारानुसार नसले तरी मी त्यांना तुझ्या मुलींप्रमाणे तुला देईन. 62तुझ्याशी मी आपला करार स्थापित करेन आणि मीच याहवेह आहे हे तू जाणशील. 63तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 16: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन