YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 11

11
यरुशलेमवर परमेश्वराचा निश्चित न्याय
1नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले. 2याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात. 3ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’ 4म्हणून त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर.”
5मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्‍यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो. 6तुम्ही या नगरामध्ये पुष्कळांना मारून टाकले आणि त्यातील रस्ते प्रेतांनी भरून टाकले.
7“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन. 8तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात. 9मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन. 10तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 11हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन. 12आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”
13आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?”
इस्राएल परत येण्याचे अभिवचन
14याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 15“मानवपुत्रा, यरुशलेमचे लोक तुमच्या निर्वासित भाऊबंदांविषयी व इतर सर्व इस्राएली लोकांविषयी म्हणाले, ‘ते याहवेहपासून फार दूर आहेत; हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला होता.’
16“म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’
17“म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुम्हाला राष्ट्रातून गोळा करेन आणि ज्या देशात तुम्ही पांगले आहात तिथून तुम्हाला परत आणेन आणि इस्राएल देश मी तुम्हाला परत देईन.’
18“ते तिथे परत येतील आणि त्यातील सर्व व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्ती काढून टाकतील. 19मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन. 20तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. 21परंतु ज्यांची हृदये त्यांच्या व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्तींकडे लागलेली आहेत, त्यांनी केलेल्या कृत्यांना मी त्यांच्याच डोक्यावर पाडीन, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.”
22नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते. 23नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले. 24आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले.
तेव्हा जो दृष्टान्त मी पाहत होतो तो समाप्त झाला, 25आणि याहवेहने मला जे दाखविले होते ते सर्व मी निर्वासित असलेल्यांना सांगितले.

सध्या निवडलेले:

यहेज्केल 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन